फ्रांस ला आल्यापासून इथल्या शांततेत डोकावून पाहायला वेळच नाही मिळाला. इथल्या रूम च्या भिंतींना एखादी बंदिश ऐकवायची होतीच. परदेशातली फक्त माणसं वेगळी असतात हा माझा गैरसमज या काही दिवसात दूर झाला. खरं तर इथली शांतता, एकांत आणि पाऊस. सगळंच वेगळं. व्हॅन गॉग च्या चित्रासारखं इथलं आभाळ सारखं हलत असतं. इतकं मोकळं आणि स्वतंत्र आभाळ मी पाहिलंच न्हवतं. इथे फ्रांस मध्ये स्वातंत्र्याचा विरोध करणारे गिलोटिन वर चढवले गेले. त्यामुळेच कदाचित त्या गिलोटिन ची भीती मनात ठेऊन हे आभाळ अधिकच स्वतंत्र होत असेल. पण आभाळासाठी गिलोटिन आणणार तरी कुठून ? पण ह्या फ्रेंच आभाळात फिरणारे ढगही मला वेगळेच वाटतात. आईच्या बोटांसारखे वाटतात. इथलं आभाळ वेगळं पण मायाळू वाटू लागतं. आभाळातून सतत सरकत जाणारे हे ढग आणि त्यांची संथ गती. आईने मायेने कुरवाळताना जशी केसातून बोटं फिरतात अगदी तसेच हे ढग आभाळातून जाताना मला दिसतात. जणू या आभाळाची आईच ते आभाळ कुरवाळत बसली आहे. एक विशाल आई. जी मायेने आभाळाला जवळ घेत असावी. हे संथपणे वाहणारे ढग म्हणजे त्या आई ची बोटं आहेत. इथे आई ची आठवण आली कि फक्त आभाळाकडे पाहायचं.
ह्या ढगांमुळे इथलं वातावरण तुमच्या वेळेच्या सेन्स चा ताबा घेतं. दुपारचे बारा वाजलेले असतानाही संध्याकाळ झाल्यासारखं वाटतं. संध्याकाळचा प्रहर यमन रागाचा असतो, पण इथला प्रत्येक प्रहर संध्याकाळ वाटू लागतो. अक्खा दिवस एक कधीही न संपणारी प्रदीर्घ संध्याकाळ. इथल्या माणसांची भाषा मला चांगली येते. पण झाडांची भाषा येत नाही. इथली झाडं कायम यमन रागात कुठलीतरी प्रार्थना करताना दिसतात. हा अक्खा मुलुख कवींसाठी बनवला आहे कि काय असाच भास होतो. त्यावर हि झाडांची कधीही न संपणारी यमन-प्रार्थना
"ए राग -ए - यमन तू सुरों का जाम लगे
सुबह सुबह जो तेरी याद आए शाम लगे
एक बार जो इस राग-ए -इलाही से मिल गया
ये खामोश इबादत भी अब हराम लगे "
या प्रार्थनेत मग्न होत माझ्या शहरात मी अनेकदा वाट चुकलो. नवीन शहर आणि नवीन देश असताना वाट चुकणे सहाजिक आहे. पण वाट चुकल्यावर असंख्य वाटा समोर येतात आणि प्रत्येक वाट एक कविता होऊन डोळ्यासमोर उभी राहते. असाच एकदा मी वाट चुकलो तेव्हा स्मशानात पोहोचलो. जवळपास सातशे वर्ष जुनं ते स्मशान होतं. प्रत्येक कबरी वर लावलेला क्रॉस माझ्याकडे पाहत होता. माझ्या हाडांपर्यंत पोहोचलेला माझा आधुनिक कोलाहल त्या मध्ययुगीन शांतते पुढे काही तग धरू शकला नाही. असंख्य कबरींवर ठेवलेले ते असंख्य क्रॉस क्षितिजापर्यंत जाताना दिसले. त्यांनी जमिनीचा असा ताबा घेतला कि जणू सारं क्षितिजच त्या क्रुसांच्या च्या आधारावर उभं आहे असं वाटू लागत. ह्या कब्रस्थानातून फिरताना अचानक मला गालिब ची कबर आठवली. एका क्षणात माझ्या मेंदूंनी हजारो किलोमीटर चा प्रवास केला ! एक वेळ अशी येते कि सगळ्या कबरी सारख्याच वाटू लागतात. कबरीखालचा माणूस कबरीच्या वर असलेल्या जिवंत जगासाठी कवी असेल. पण कबरीखाली तो असतो फक्त सापळा. आणि इथे या दूर देशीच्या कबरीस्थानात असंख्य अनोळखी माणसं दफन होती. पण एकाच जमिनीत. मला त्या क्षणी काका गेले तेव्हाचे दिवस आठवले. पंच्याण्णव वर्षाच्या काकांची चिता जळत होती आणि बाजूला आणखीन एक अनोळखी चिता होती. पण दोन्ही चितांमधला धूर एकत्र होऊन एकाच आभाळात जात होता. (कदाचित) एकमेकांना ओळखीचा होत.
त्या स्मशानात अशी भयानक वादळं माझ्या मनात उठत होती. मी एकदाच वाट चुकलो आणि माझ्या नशिबी अली हि मध्ययुगीन शांतता. वाट सापडण्या पेक्षा वाट चुकल्यावर माणूस जास्त गहिरा होत जातो. तो मृत्यू येण्याआधीच बघून घेतो मरण काय असतं ते. गालिब चा हा शेर सारखा डोकावून पाहत असतो.-
"था ज़िन्दगी पे मर्ग का खटका लगा हुआ
उड़ने से पेशतर भी मेरा रंग ज़र्द था "
"उडण्या आधीच माझा रंग पिवळा पडला होता" अशी अफाट कल्पना करणारा गालिब काही या फ्रेंच माती मध्ये जन्मू शकला नाही. (जसा आपल्याकडे बोदलेयर आणि काम्यू नाही झाला तसाच ?)
इथे फ्रांस मधे मी असाच वाट चुकल्यासारखा फिरत असतो, आणि प्रत्येक अनोळखी वाटेवर भेटणारी अनोळखी कविता वाचत बसतो.
"गावाच्या वेशीवरती
सुईणीच्या घरची वाट
तू तिथेच बसशी का रे ?
सारणाचा मांडून थाट
हा गाव क्रुसाची माला
क्षितिजाला पेलवणारी
बघ बंदिश गाऊन आली
मागच्या युगातून स्वारी
आईच्या स्तनांवर वेणी
हा तसाच वळतो घाट
परदेशी जाणाऱ्यांची
वेशीवर चुकते वाट ...
-कॅम्पेर , ब्रिटनी .फ्रांस ०२-१०-२०२१
No comments:
Post a Comment