Thursday, 2 April 2020

वेशीपलिकडे...

बघता बघता उन्हाळा गर्द होत जातो. दुपारची मरगळ सांभाळत म्हाताऱ्या आजोबां सारखा एक ढग जड पावलांनी आभाळ पार करताना दिसतो. अभाळाचा निळाशार रितेपणा पंखात कुठेतरी लपवून ठेवत एखादा कावळा क्षितिज कपत जात राहतो. या तप्त विराणी ला अंगाईचे स्वर चढवल्या सारखा गाव निपचित पडून राहतो. कुठलीशी अनोळखी निद्रा पार पेशींपर्यंत पोहचून जाते. पाचोळाही हलत नाही. शांततेने बडा ख्याल बंदिश गायल्या सारखा एक अजबसा मंद आलाप मात्र कानावर पडत राहतो. ही दुपार म्हणजे धड सुरवातही नाही आणि शेवटीही. निर्मितीच्या आणि ललित्याच्या सगळ्याच संवेदना पहाटे आणि संध्याकाळी जाग्या होतात. दुपारचा एकसारखेपणा, स्तब्धता आणि रिकमेपण संवेदनेला स्पर्शही करत नाही. स्वतःला संध्याकाळचा कवी म्हणवणाऱ्या ग्रेस ने मात्र दुपारचा हा आभाळभर घुमणार मंद आलाप ऐकला होता.
जिथे उभारली घरे, तिथे अपार शून्यता
दुपारच्या उन्हातली विचित्र एकसंधता

तहान ही मला गिळे नि कंठ हो तुझा निळा
उन्हात पाय वाजती, कुणात जीव गुंतला ?

आम्ही भर दुपारी फिरायचो, गल्लीबोळातून आणि रिकाम्या रस्त्यांवरून धावत सुटायचो. आकाशाच्या पोकळीचा हा भयंकर रितेपणा अक्खा गाव शोषून घेईल की काय ही रोमांचक भीतीच कदाचित माझा पाठलाग करत असावी. कल्याणच्या वेशीवर दुर्गाडीच्या डोंगरावर भल्या दुपारी (मंदिरातील देव सोडला तर) कोणीच नसायचं.  भर दुपारी गावच्या वेशीवर जाऊन बसणं हा एक विचित्र अनुभव असतो. कल्याण शहर दुपार झाली की निपचित पडून असतं. सगळी कामं संपवून दुपारी निवांत झोपलेल्या आईसारखं ते शहर दिसायचं. मुख्य रस्त्यावर मात्र वाहतूक चालू असायची. खाडीवरून शहराला इतर शहरांशी जोडणारा पूल दुर्गाडी किल्ल्यावरून स्पष्ट दिसे. हा किल्ला आणि या खाडी ने असंख्य स्थित्यंतरे पहिली असतील. मुघल, पोर्तुगीज आणि प्रामुख्याने मराठे या खाडीद्वारे व्यापार चालवायचे. हीच ती खाडी जिने स्वराज्याचं पाहिलं स्वतंत्र नौदल उभं राहताना पाहिलं. कितीतरी कथा, इतिहासलाही अनोळखी असलेल्या अदृश्य गोष्टी या खाडीच्या तळाशी खोलवर लपून बसल्या असतील. भर दुपारी मात्र ही खाडी निळ्याशार आभाळाच्या कानात याच गोष्टी सांगत असेल. म्हणून की काय त्या ऐकायला मी तिथे किल्ल्यावर जाऊन बसायचो. 
अश्या असंख्य गोष्टी गावच्या वेशिवरच असतात. गाव, गाव जिवंत असतो. रक्तवाहिन्यां सारखे पसरलेलं गावचे रस्ते वेशीपाशी येऊन थांबतात. गावांच्या वेशी जोडणारे असंख्य पूल आपण बांधले. देशांच्या सीमा ओलांडून परदेश पाहिले. पण आपल्या गावच्या वेशीपालिकडू दिसणारा गाव आपल्याला परकाच राहिला. वेशीपालिकडे माझ्यासारखाच कोणीतरी उभा असेल. त्याच्या नजरेतून दिसणारा माझा गाव न्याहाळत. वेशीपाशी येऊन गाव थांबतो आणि वेशीपालिकडे सुरू होतो एक परकाच गाव. वेशिपालिकडच आभाळही परकं वाटू लागतं. प्रत्येक गावाचं एक स्वतंत्र आभाळ असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी वेस ओलांडताना क्षितिज पार केल्याचा भास होईल. गावच्या वेशीवर शेवट असतो आणि कदाचित सुरवातही.


गावाच्या वेशिवरती
सुईणीच्या* घरची वाट
तू तिथेच बसशी का रे
सारणाचा मांडून थाट..!