Wednesday, 30 September 2020
खंजीर
Sunday, 27 September 2020
देऊळ पलीकडे तरीही
तो जिवंतपणे, डोळे सताड उघडे ठेऊन जगायचा. तरीसुद्धा त्याचे डोळे मिटलेलेच वाटायचे. अंगाईनंतर येणाऱ्या निद्रेसारखा तो वाटे. तो जागा कधीच न्हवता. त्याने शांतपणे झोपून घेतलं असावं. मला नेहमी वाटत what if life herself is a wonderful dream, and death is its only awakening. मृत्यू म्हणजे माणसाला आलेली जाग असावी. आपण मारतो म्हणजे आपण जागे होतो. याची जाणीव मला त्याच्या मृत्यूनंतर झाली. त्याचा मृत्यू मी जवळून पहिला. स्मशानात जाऊन, अस्थी आणेपर्यंत. माणूस पूर्णपणे नाहीसा झालेला मी पहिला. त्याच्या मृत्यूनंतर तो जास्त जिवंतपणे जाणवू लागला. प्रदीर्घ आजाराने ग्रस्त. निष्पर्ण झालेल्या झाडावरच्या शेवटच्या पानाप्रमाणे आयुष्याला धरून बसलेलं त्याच शरीर मला सारखं आठवत राहतं. शेवटचं पान उडून जाण्याची वाट बघत. तो सतत झोपलेलाच असायचा. प्रचंड वेगाने वारा वाहू लागेल, आणि ते शेवटचं पण उडून जाईल.
चिंतामणी केशव कुलकर्णी, वटवृक्षासारखा वाटणारा माझा मामा. कायमचा झोपून राहायचा. परमेश्वराकडे जाणारे सगळेच रस्ते त्यांनी तुडवून पहिले. अक्खी भगवद्गीता पाठ कशी होऊ शकते ? याचं अप्रूप मला सारखं वाटत राहायचं. त्याने केवळ परमेश्वरच पहिला असावा असंही वाटायचं. त्याचा आठवणी तर असंख्य आहेत. "तू ग्रेस वाच" असं त्यानेच पहिल्यांदा सांगितलं होतं.
घरातलं कोणीच जवळच वाटत नसे. सगळे दूरच्या प्रदेशातून आलेले पाहुणेच वाटायचे. कवितेच्या वाट्याला जाणारं कोणीच न्हवत. कविता फक्त त्यालाच जाणवली होती. "स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे ?" या ओळीतली स्थितप्रज्ञ शांतात त्याच्या डोळ्यात नेहमी दिसायची.
तोच आता पडून असतो, रोज उशिरा येणाऱ्या प्रियकराची वाट बघत बसलेल्या प्रेयसी सारखा तो मृत्यूची वाट बघत असावा. न हलणाऱ्या शरीराचं ओझं फेकून द्यायच्या मार्गावर. माझ्या मामाची औषधं द्यायला माझे आजोबा यायचे. मी पाहायचो नव्वद वर्षाच्या बापाला आपल्या साठीला आलेल्या मुलाला औषध देतानाचं ते दृश्य पाहायची ताकदच राहायची नाही. म्हणून कि काय मी खिडकीजवळ येऊन बसायचो. असंख्य दिशा फिरलेल्या माझ्या मामाचं आभाळ या खिडकीपयर्त येऊन थांबलं होतं. तो काय पाहत असेल या खिडकीतून ? तारुण्यात ज्या आभाळा पलीकडची स्वप्न पहिली ते हेच आभाळ असावं का ? कि तारुण्यातलं आभाळच वेगळं असतं ? कि त्याला अंगाई ऐकू येत असेल ? एका प्रदीर्घ निद्रेआधीची ?
आजारी पडलेल्या आपल्या वृद्ध मुलाची काळजी करणारे नव्वदीला आलेले माझे आजोबा, त्यांना काका म्हणण्याचा प्रघात आहे. या स्वतंत्र भारतावरच्या स्वतंत्र आभाळापेक्षाही जुने त्यांचे डोळे मला कधीही ने संपणाऱ्या वाचनालयाच्या रांगांसारखे वाटू लागतात. मृत्यूच्या दिशेने जड पाऊल टाकणाऱ्या आपल्या मुलाची आपल्यालाच काठी व्हावं लागेल असं त्यांना वाटलं असेल का ? काका जेव्हा मामाला औषध द्यायचे तेव्हा. जीवनाची सगळीच समीकरणं कोलमडून पडल्यासारखी वाटायची. ते दोघे जड पावलांनी रास्ता कापत दूर वेशीवरच्या मंदिरात जात आहेत. अद्याप चालून आलेल्या अवाढव्य रस्त्याचं ओझं पाठीवर घेऊन. मागे एकही कटाक्ष ने घालता. ते चालत आहेत. मामाचा प्रवास थांबला. पण काका अजूनही चालतायत. रिकाम्या आभाळातल्या एकाच अंधुक ताऱ्यासारखे. ते क्षितिज पार करू पाहतायत.
केशव विश्वनाथ कुलकर्णी आणि चिंतामणी कुलकर्णी. हे दोघेही कवितेतल्या न सुचलेल्या ओळीसारखे एका रिकाम्या कोपऱ्यात कायमचे बसून राहिलेले भासतात, न सुचलेली ओळ. जी आयुष्यभर आपला पाठलाग सोडत नाही. क्षितीजाच्या न संपणाऱ्या रेषेसारखी ती सदैव जाणवत असते. तिला कधीच मृत्यू नसावा. आणि असला तरी मरण हे झोपेतून जाग येण्यासारखंच आहे.
मृत्यूच्या दिवशी, खडबडून जागा झाल्यासारखा, चिरतरुण होऊन तो वेशीवरच्या देऊळाच्याही पलीकडच्या रस्त्याला लागला असेल.
देऊळ पलीकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळा पाशी
मी उरला सुरला थेंब
-ग्रेस