Sunday, 8 March 2020

झाडात पुन्हा उगवाया


सकाळ व्हायची तेव्हा, सुट्टीच्या दिवसांमध्ये सकाळीच गच्चीवर जाऊन बसण्याचा  प्रघात असायचा. तेव्हा आभाळाला भेदत निघणार्या अजान च्या सुरांवर सतत हलणारी तीन नारळाची झाडं एखाद्या सुफी संता प्रमाणे डोलताना दिसायची. संध्याकाळी त्याच झाडांमागे सूर्य लपून जायचा. गच्चीच्या दरवाजात बसलेला मी त्या मोठ्ठ्या चौकटीतून ती झाडं पाहत बसायचो. एखाद्या स्थिर तैलचित्रा सारखी ती चौकट दिसायची. त्या चौकटी एवढंच आपलं शहर आहे आणि आपलं अस्तित्व आहे असं तेव्हा वाटायचं. चौकटीत वारा मात्र सैतानेने सोडलेल्या उश्वासा सारखा सोसाट्याने वाहायचा. कालांतराने त्यातली दोन झाडं  नाहीशी झाली आणि उरलं एकच. त्या झाडाशी तासंतास गप्पा मारत बसणे हा माझा उद्योग असायचा. 
लहानपणी, मी आणि सोनू तिथे बसलेलो असताना मी त्याला म्हणायचो “आता मी जेव्हा हाथ वर करून ये..  ये… असं म्हणेन तेव्हा वारा येईल” मी मोठ्याने “ये” म्हंटल कि सोसाट्याचा वारा त्या चौकटीत यायचा. आणि माझ्यात खरच काहीतरी दिव्य आहे असं समजून सोनू चेहऱ्यावरून वारा गेल्या सारखा पाहत बसायचा. खरं  तर तेव्हा मी त्या झाडाकडे नजर ठेवून असायचो. ते झाड डोलायला लागलं म्हणजे काही सेकंदात वारा इथे येणार असं गणित असायचं. ते झाड आणि मी, आम्ही दोघ तेव्हापासून एक मेकांचे साथीदार बनलो. सोनुला फसवल्यावर  झाड मिश्किलपणे हसून मला डोळा मारत असे. झाडं माझ्याशी बोलतात किंव्हा त्यांची भाषा मला समजते असला फाजील भास मला नेहमी होत राहतो. झाडांचे पण देव असतील का? त्यांचा धर्म कुठला असेल? असे प्रश्न मला आजही पडत राहतात. रात्रीच्या प्रहरात झाडे धनस्थ बसून कोणासाठी प्रार्थना करत असावीत ?
गाचीवरून दिसणारं झाड माझ्या त्या चौकटीतल्या जगाचा एक अविभाज्य भाग होत गेल. मी रोज दाराजवळ बसून जे काही दिवसभरात घडल ते सगळ त्याला सांगायचो. कधीतरी ‘बस झालं यार पकवू नको” असंही झाड म्हणायचं. कधीतरी त्याच्या पानांचा स्पर्श मला दूरवर बसून सुद्धा जाणवायचा. एक मेकांकडे तासंतास पाहणारे आम्ही एकमेकांना बरच काही सांगून जायचो. कधीतरी झाडाने  लिहिलेल्या कविता मी भाषांतरित करीन. असंही मी त्याला सांगितल. त्यावर “झाड कविता लिहित असत वार्यावर आणि वार्यासोबत त्याची कविता देशांतर करते. ती कविता खर तर आपोआपच भाषांतरित होत असते. पण प्रत्येकाला ती वाचता येत नाही.” असं झाड मला सांगायचं. 
झाडाला एकच ठिकाणी  पाय रोवून उभं राहण्याचा आणि मनुष्याला एका ठिकाणी  स्तबद्व उभे न राहण्याचा शाप आहे. झाड आणि मानव हे दोन्ही शापित जनावरं आपापल्या परीनं एक मेकांशी संग करत जगात राहतात. पण कधीतरी मी माझे पाय झाडाला दिले आणि त्याबदल्यात त्याची मूळं घेतली तर? तर झाडही देशांतर करेल. प्रवास करेल लोकलच्या गर्दीतून. वेळापत्रकाच्या पिंज्रात अडकल्या सारखं झाडही नाचू लागेल नियतीच्या तालावर. झाडालाही मिळेल नागरिकत्व आणि अधिकार. आणि मी? मी उभा राहीन स्तब्ध खोल जमिनीत माझी मूळं  साम्राज्य पसरवतील. अनोळखी पक्ष्यांचा एक अनोळखी निवारा बनून मी सुद्धा लिहीन माझ्या असंख्य कविता वार्यावर. 
झाडाला माझी सगळीच सुख दुख माहित असायची. या वीस एक वर्षात सार काही बदलून गेलं. जग प्रत्येक सेकंदा सोबत अनोळखी होत गेलं. पण माझी चौकट मात्र तशीच होती. गच्चीच्या दारात बसून दिवसेन दिवस दिसणाऱ्या त्या चौकटीत काहीही बदल न्हवता. चित्रकार चित्रात वेळ गोठवून ठेवत असतो. अगदी तसच एक जिवंत चित्र बनून ती चौकट माझ्या समोर यायची. 
त्या दिवशी मी असाच दारात जावून बसलो. पण झाड मात्र कुठेच न्हवत. एखाद्या अमुल्य पेंटिंग वर चीर पडून त्याला नष्ट केल्या सारखी ती चौकट दिसत होती. झाड पडलं ? पाडलं ? माहित नाही. वृक्ष मेला कि त्याचा मानवा सारखा अंत्यसंस्कार होत नाही. झाड कायमच नाहीसं झालं. अचानक जवळचा मित्र शहर सोडून कायमचा गेल्यासारखं. ज्या ठिकानी झाड होतं तिथे आता क्षितिजाला एक मोठ्ठ छिद्र पडलंय. आणि त्या छिद्रातून मला दिसतंय चौकटी पलीकडचं जग. 

ते झरे चंद्र सजणांचे ती धरती भगवी माया 
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया 
  • ग्रेस